टप्पा वाढीची शालेय शिक्षण विभागाची फाईल सतरा वेळा मागे*
अमळनेर Express news अमळनेर प्रतिनीधी.
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाणीवपूर्वक नकार घंटा*
*राज्यातील शिक्षकांचा वाढता असंतोष*
*माखजन |वार्ताहर*
महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे आंदोलन मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू आहे.४२ दिवस उलटले तरी वेतन अनुदानाच्या टप्पा वाढीचा विषय कॅबिनेट ला येऊन मार्गी न लावल्यामुळे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे.
टप्पा वाढीचा विषय होणार असल्याचे निवेदन पावसाळी अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते.त्यांनुसार जून २०२४ पासून राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ देण्यासाठी व, कॅबिनेट निर्णय होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून फाईल अर्थ खात्यात पाठवण्यात आली,अनेक त्रुटी काढून फाईल सतत ,सतरा वेळा पुन्हा शिक्षण खात्याकडे आली.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत टप्पा वाढ दिला जाईल असे बोलत असताना देखील प्रत्यक्षात विषय मार्गी लागताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून,अर्थखात्याला अगदी हवी तशी फाईल पोहोच आहे.परंतु अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या टप्पा वाढी संदर्भात असलेल्या नेहमीच्या नकार घंटेमुळे हा विषय मागे राहत असल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर होत आहे.
महायुतीतल्या भाजपा व एकनाथ शिंदे गटाच्या खात्याकडून येणाऱ्या फाईल सतत डावलल्या जात असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे.महिन्यापूर्वीच्या कॅबिनेट मध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी २५/१५ अंतर्गत खात्याला निधी द्या अशी मागणी केली.ही मागणी कॅबिनेट ला अजित पवार यांच्या कडून फेटाळण्यात आली होती.त्यावरून त्या कॅबिनेटला खडाजंगी झाली होती.अशीच नाराजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ६ सप्टेंबर रोजी जळगावच्या सभेत केली होती.गुलाबराव पाटील यांनी अर्थखातच नालायक असल्याची बोचरी टीका करत दहा दहा वेळा फाईल मागे येतात असे जाहीर सांगितले होते.अर्थमंत्री अजित पवार यांचे कडून शिक्षण खात्याच्या टप्पा वाढ अनुदान फाईल ला देखील सापत्न वागणूक दिली जात असल्याची स्थिती आहे.
एकीकडे शिक्षक समन्वय संघाच्या मुख्य समन्वयकांसमोर,शिक्षक आमदारांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, टप्पा वाढीची फाईल कॅबिनेट समोर ठेवा असा आदेश दिलेला असताना,अर्थविभागाकडून केवळ अर्थमंत्री अजित पवार यांच्या नकार घंटेमुळे ही फाईल कॅबिनेट ला येत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अर्थखाते म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशी परिस्थिती झाल्याचे चित्र दिसंत आहे.
४२ दिवस उलटून गेले तरी शिक्षकांच्या टप्पा वाढीचा विषय मार्गी लागत नसल्याने ,आझाद मैदानावरील लोकशाहीच्या मार्गाने शांततेत चाललेले आंदोलन,चिघळण्याच्या हिंसक मार्गाला लागण्याच्या वळणावर आले आहे.
माखजन वार्ताहर