धरणगांव येथील महाजन परिवाराचा क्रांतिकारी निर्णय !… जळगाव शहरात दुसरा सत्यशोधक विवाह संपन्न !…

0

अमळनेर Express news 

सत्यशोधक विवाह लावणे ही क्रांतीची सुरुवात – राजुमामा भोळे (आमदार )

जळगाव जिल्ह्यात यापुढे सत्यशोधक विवाहच लागतील – पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष )

धरणगांव – धरणगाव येथील नामदेव नारायण महाजन यांचे नातू नामदेव महाजन यांचे ज्येष्ठ सुपुत्र सत्यशोधक प्रफुल्ल व शिरसोली येथील कै.दगा तुकाराम माळी यांची नात जितेंद्र दगा माळी यांची तृतीय कन्या सत्यशोधिका उर्मिला यांचा १५ डिसेंबर २०२४ रोजी सावता नगर येथे सत्यशोधक विवाह महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांना स्मरूण जळगांव शहरात संत सावता नगर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
सत्यशोधक विवाह मंडपात क्रांतीची मशाल घेऊन वधू-वरांनी आगमन केले. सत्यशोधक प्रफुल्ल व सत्यशोधिका उर्मिला व त्यांच्या मातापित्यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, संत कबीर, विद्रोही संत तुकाराम महाराज सावता महाराज, रविदास महाराज, अहिल्यामाई होळकर, छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा या सर्व महामातांचे व महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
” सर्व साक्षी जगत्पती त्यास नकोच मध्यस्थी ” या उक्तीप्रमाणे महात्मा जोतिराव फुले निर्मित सत्यशोधक समाजाच्या विधीनुसार सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोल यांच्या मार्गदर्शनाने जळगांव शहरात दुसरा सत्यशोधक विवाह संपन्न झाला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील,रवींद्र तितरे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे, जिल्हा संघटक आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक संघटनेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम मनोरे तसेच राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाहाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम सामूहिक सत्यशोधक समाज संघाची प्रार्थनाचे गायन करण्यात आले. सत्यशोधक प्रफुल्ल व सत्यशोधिका उर्मिला यांनी शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते वधू-वरांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले. अक्षदा ऐवजी फुलांची उधळण करण्यात आली.
याप्रसंगी पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाची भूमिका मांडून राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व सत्यशोधिका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जीवन संघर्ष उलगडून सत्यशोधक समाजाचे कार्य सांगून आज महाराष्ट्रात सत्यशोधक समाज संघ पुनर्जीवित झालेला असून सर्वांनी सत्यशोधक पद्धतीने विधी करावेत असे आवाहन केले.जिल्हा संघटक लक्ष्मणराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सांगून दोन्ही क्रांतिकारी परिवारांचे अभिनंदन केले. सत्यशोधक विवाह लाऊन ही क्रांतीची सुरुवात जळगाव शहरात झालेली आहे असे प्रतिपादन जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी केले. सत्यशोधक विवाह प्रसंगी जळगाव शहरातील सामाजिक,राजकीय, पत्रकारिता,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!