व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन

0

साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात जाहिरात शेड्यूल मधून वगळल्याने दुरुस्ती व्हावी

जळगाव : राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती ‘साप्ताहिक वृत्तपत्र’ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. परंतु जाहिरात शेड्यूल मधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात आले या पार्श्वभूमीवर व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब व मा. जिल्हाधिकारी साहेब, जळगाव यांना उपविभागीय अधिकारी अमळनेेर भाग यांचेमार्फत आज हे मुख्य मागणीसह अन्य मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांनाही पाठविली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेगवेगळ्या विविध योजनांची घोषणा करण्यात येत आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी, प्रसिद्धीसाठी, राज्यातील मोठ्या आणि निवडक दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिराती प्रकाशित करणे, त्याचबरोबर आकाशवाणी, सोशल मीडिया, डिजिटल माध्यम, व्हॉइस माध्यम यांच्यामार्फत प्रसारण करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु संपूर्ण राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्र हे आजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपल्या सर्व योजनांची माहिती साप्ताहिक वृत्तपत्रातून जास्तीत जास्त जागेमध्ये जनतेपर्यंत पोहोचवत आहे. परंतु या जाहिरात शेड्यूल मधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेड्यूल मधून वगळण्यात आले होते. त्यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटने कडून आवाज उठवला होता. परंतु त्यावेळी सर्व जाहिरातीचे वितरण झाले आहे पुढच्या वेळी नक्की प्राधान्य देऊ असे सांगण्यात आले होते. असे असूनही पुन्हा आपल्याकडून साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरातीच्या शेड्यूल मधून वगळण्यात आले आहे हे साप्ताहिक वृत्तपत्रांवर अन्याय करणारे आहे.
मा. मुख्यमंत्री साहेबांनी शासनमान्य वृत्तपत्रांना जाहिराती देणे बंधनकारक असताना, २०१७ आणि २०१९ चा जाहिरात धोरणाचा आदेश अन्याय करणारा आहे. हा आदेश त्वरित रद्द करून पुन्हा दैनिकांच्या बरोबरीने साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या वतीने करण्यात येत आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास मात्र आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे. प्रमुख मागण्यांमध्ये.. १) साप्ताहिक वृत्तपत्रांना दैनिकाप्रमाणेच प्रासंगिक जाहिरातीचे वितरण करावे. २) वर्षभरामध्ये नैमित्तिक पाच जाहिरातीचे वितरण पुन्हा चालू करावे. ३) अकोला येथील पत्रकार शंकर रामराव जोगी यांना टोल नाक्यावर मारहाण केलेल्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. ४) २०१७ व २०१९ यावर्षी साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करणारा जाहिरात बंदीचा आदेश त्वरित मागे घ्यावा. ५) पंचवीस वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना विशेष जाहिरात देण्यात यावी. अशा मागण्या व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग च्या वतीने करण्यात आल्या आहेत. निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग चे प्रदेशाध्यक्ष रोहित जाधव, प्रदेश सरचिटणीस वामन पाठक, प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कयूम, प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी, साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, जिल्हा सरचिटणीस हेमंत वैद्य, अजय भामरे, बापूराव पाटील, उमाकांत ठाकूर, ईश्वर महाजन, उमेश काटे, रविंद्र मोरे, उमेश धनराळे, कमलेश वानखेडे आदींच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!