राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची सहविचार सभा अमळनेरात संपन्न !!!
अमळनेर Express news
संविधान वैश्विक जीवनाचे सुत्र आहे
संयोजक मा.भरतजी शिरसाठ
संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाबद्दल जनजागृती व्हावी यासाठी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेमार्फत संविधानाच्या सखोल मार्गदर्शन होण्यासाठी जानेवारी २०२५ ला एरंडोल तालुक्यात होऊ घातलेल्या अधिवेशनासाठी अमळनेर सहविचार सभा प्रबुद्ध विहार, प्रबुद्ध कॉलनी अमळनेर येथे संध्याकाळी ५.३० ही सभा विचार मंथनासाठी आयोजली होती. या सभेसाठी विचारमंचावर भंते अमरज्योती नागपूर, राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे संयोजक मा. भरत शिरसाठ, शब्दा परिषदेचे मार्गदर्शक मा. धनराज मोतीराय ,समन्वयक विवेक सैंदाणे, प्राध्यापक अशोक पवार, प्राध्यापक लीलाधर पाटील, माजी शिक्षणाधिकारी अशोक बिराडे, मौर्य संघाचे बन्सीलाल भागवत, बुद्ध महासंघाचे सिद्धार्थ सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी अशोक जी बिराडे हे होते.
याप्रसंगी तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आलेल्या मान्यवरांचा सत्कार पुरोगामी विचारांचे पाईक अशा लोकांच्या हस्ते करण्यात आला. बुद्ध महासंघाच्या दिनदर्शिका व बोर्डाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना मा. धनराज मोतीराय सरांनी बुद्धाच्या खऱ्या विचारला जीवनात स्थान देण्याची गरज आहे. बुद्ध विचार हा सकलांचा विचार आहे असे आपल्या भाषणात त्यांनी व्यक्त करून राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची भूमिका स्पष्ट केली. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे संयोजक भरतजी शिरसाठ यांनी संविधान हे विश्वक जीवनाचे सूत्र आहे असे प्रतिपादन केले. मनुवाद्यांना वैज्ञानिक भारत होणे सहन होत नाही. येथे शिवधर्माचे व बुद्ध धम्माचे एकत्रीकरण होऊ दिले जाते. बुद्धाला अपेक्षित भारत होण्यास धर्मांध अडसर आहेत. आपल्याला मानवता उभी करायची आहे. मा.भरत शिरसाठ सरांनी एरंडोल येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली.हया अधिवेशनासाठी अमळनेरच्या पुरोगामी विचारांच्या व संविधान प्रेमींना अधिवेशनासाठी मोलाचे सहकार्य करण्याची विनंती केली. संविधानासाठी सातत्यपूर्ण काम झाले पाहिजे तरच संविधान वाचवता येईल. असे बोलून त्यांनी अधिवेशन अगदी वैचारिक मेजवानी देऊन जाईल अशी आश्वासन दिले. यानंतर भंते अमरज्योती यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म समजून घेतला व सर्वांना समजावून दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांचे राहिलेले काम पूर्ण केलेले आहे. यानंतर प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी संविधान हे तार्किक पद्धतीने स्वीकारण्याची गरज आहे. संविधान हे सर्वांचे आहे अशी जाणीव करून दिली पाहिजे. प्राध्यापक अशोक पवार अध्यक्ष युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर यांनी आपल्याला मिळालेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. संविधानावर हल्ले होत असताना बहुजनांची प्रतिक्रिया येत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोकजी बिराडे यांनी संविधानाचा सतत जागत झाला पाहिजे. संविधानाचे महत्त्व प्रत्येकाला समजले पाहिजे. संविधान प्रेमींनी संविधानाला लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची भूमिका अत्यंत पारदर्शी आहे. संविधानाबद्दल अगदी सखोल माहिती अधिवेशनामध्ये मिळेल याबद्दल शंका नाही असे आपल्या भाषणात व्यक्त केले. यानंतर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेच्या मंडळींनी सर्व प्रकारच्या मदतीसाठी संयोजन समितीची स्थापना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी हजर होते