मंगळ ग्रह सेवा संस्था भगवा चौक गणेशोत्सव मंडळ राबवतायेत आगळे- वेगळे उपक्रम
अमळनेर Express news
अंमळनेर प्रतिनीधी
येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व भगवा चौक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवामध्ये आगळे- वेगळे उपक्रम राबवित आहेत. सर्वसाधारणपणे आरतीचे मानकरी म्हणून नेहमी पुरुषांना निमंत्रित केले जाते .भलेही ते सपत्नीक येतात. निमंत्रण मात्र पुरुषाच्या नावानेच असते किंवा फार तर फार श्री. व सौ. असा उल्लेख केलेला असतो. त्या नंतर मात्र नाव पुरुषाचेच असते. महिलांना सार्वजनिक मानसन्मानात सतत डावलले जाते, त्याची कुठे ना कुठे हलकीशी का होईना खंत प्रत्येक महिलेला असते. या पार्श्वभूमीवर मंगळ ग्रह सेवा संस्थेने आता गणेशोत्सव व नवरात्रोत्सव यासाठी या काळात सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही आरत्यांचे मानकरी म्हणून शहरातील सर्व महिला मंडळांना निमंत्रित केले आहे. सर्व आमंत्रणे ही महिलांच्या नावांनीच पाठवण्यात आली आहेत .मानकरी महिला त्यांच्या पतीदेव व कुटुंबासह येतात . मात्र मानकरी म्हणून महिलेचेच नाव जाहीर केले जाते. या उपक्रमामुळे माता-भगिनींचा आत्मसन्मान सुखावला आहे. त्याचप्रमाणे भगवा चौक मित्र मंडळाने गणेशोत्सवा निमित्त मंडपात विविध देशभक्त व स्वातंत्र्य सेनानी तसेच महत्त्वाचे संदेश यांचे फलक लावले आहेत. त्यातून प्रबोधन करण्याचा व ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले, त्याग केला त्या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हे फलक वाचण्यासाठी मोठी गर्दी होत आहे .तसेच कोण ताही फिल्मी कार्यक्रम न करता रोज परिसरातील नागरिक विशेषतः लहान मुले एकत्र येऊन सामूहिक रित्या अथर्वशीर्षाचे पठाण करीत आहेत.
या दोन्ही उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.