विनायक चतुर्थी (अंगारक योग) निमित्त भाविकांचा लोटला जनसागर
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
श्री मंगळग्रह मंदिराला आले यात्रेचे स्वरूप
अमळनेर :
मराठी वर्षात विशेष महात्म्य
असलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. दिवाळीनंतर प्रबोधिनी देवउठनी कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. कार्तिक शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी होते. या दिवसाचे महत्व लक्षात घेता ५ रोजी मंगळवारी येथील मंगळग्रह मंदिरात अभिषेक व मंगल शांती पूजेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
नोव्हेंबर महिन्यातील या विनायक चतुर्थीचे विशेष म्हणजे या दिवशी अंगारक योग जुळून आला आहे.
अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की, अंगारक योग जुळून येतो. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो.
त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की ‘माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते.
अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते, अशी मान्यता आहे. गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला. तेव्हापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असे मानले जाते. धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात मनात असूनही अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती पूजन करणे शक्य झाले नाही, तर एक दुर्वा अवश्य अर्पण करावी. मनोभावे गणपती बाप्पाचे स्मरण, नामस्मरण करावे. असे केल्याने पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.